इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करुन घेण्याचे आवाहन…

इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करुन घेण्याचे आवाहन

पुणे दि. ७ : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शासन आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२४ अशी होती. परंतु, जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज अद्यापपर्यंत जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात दाखल केले नाहीत. अशा विद्यार्थ्यांकरिता मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रमानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अनुसूचित जाती. विमुक्त जाती. भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागास प्रवर्ग (मराठा) या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी विज्ञाननंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, औषधनिर्माण विज्ञान (फार्मसी), कृषी, पशुसंवर्धन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी तसेच प्रवेश घेतल्यानंतर राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेऊन जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

त्यामुळे अद्यापपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल केला नाही त्यांनी त्यांचे अर्ज CCVIS किंवा www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावेत व त्याची छापील प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, स. नं. १०४/१०५, आळंदी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, पुणे-४११०१५ या ठिकाणी सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी सकाळी ९-४५ ते ६-१५ या वेळेत दाखल करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य संजय दाणे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *